आठवणींच्या जगात पाय ठेवला आणि ह्यावेळी भेटली ती काही नाती ...
हरवून गेलेली ...
कुणाच्या ह्या जगातून जाण्यामुळे काळाच्या ओघात हरवलेली...
तर काही गैरसमजामध्ये गुरफटून मला चिडवणारी ...
काही जुन्या गावची... काही जुन्या घरची ....
काही जुळून येण्याआधी निसटून गेलेली .....
काही मी तोडून टाकलेली , आणि काही समोरून नाहीशी झालेली ....
काही सुखावणारी , काही दुखावणारी ...
पण दुखावणारी असली तरी हवीहवीशी ... हसरी दुःखं जशी ...
काही क्षणात जमलेली , आणि काही वर्षानुवर्ष असूनही विरून गेलेली ...
काही आता फक्त आठवणीतच भेटतील अशी ...
आणि काही धूळ झटकून नव्यानी फुलवता येतील अशी ...
काय करावं बरं ? हव्याहव्याश्या हसऱ्या दुख्खांना तसा धुळीतच पडून दयावं ... की नव्या उमेदीने त्यांना आपलंसं करावं ?
हळुवार , नाजूक नाती तर कायम मनाला आनंद देतीलच ...
पण मनात टोचत राहणाऱ्या ह्या नात्यांचा काय करावं बरं....?
इतकी वर्ष उलटून गेली , मी त्यांना तसंच ठेवून दिला ...गुंता वाढवला...
आता तोः सोडवणं , त्याला नाव देणं कठीण झालंय. ...
एकदा वाटलं , जाऊदेत , कुठे आता पुन्हा .... ती कटकट , ते रुसणं , ती मनधरणी
पण मग दिसली काही नाती ... ज्यांनी मला आयुष्य भरभरून जगायला शिकवलं ...
ज्यांनी आला दिवस हसून जगायची युक्ती शिकवली ...
ज्यांनी निरपेक्ष प्रेम करून तसंच करायला शिकवलं.....
माणूस आहे ... चूक होणारच की... समोरच्याची असो किंवा माझी ...
काळाच्या ओघात प्रसंग पुसट झाले ...
राहिला तोः अहंकार ...
झटकून टाकायला हवा... शोधायला हवं मी , हरवलेल्या नात्यांना ...
एकदा का हा अहंकार गळून पडला की कदाचित ही नाती प्रत्यक्षात उतरतील ,
आठवणींचं जग सोडून वर्तमानात येतील ....
आणि नाहीच आली ... तर ...
मी प्रयत्न केल्याचं समाधान कुणी कसं बरं हिरावून घेईल माझ्यापासून... :-)