एक क्षण रोजचा....आजचा..... अगदी कालच्यासारखा.....
घड्याळ पुढे..... पाऊल पुढे..... आयुष्य पुढे.....
वाट सरता सरत नाही ......
निसटुन जातात क्षण सरसर.....
आयुष्य हातात उरत नाही..... तरीही .......तरीही चालूच.......
गाडी चालू... ऑफिस चालू..........
सुट्टी हवी...आणि ईनक्रिमेन्ट पण!!!!
घर हवं , दागिना हवा... ईच्छा संपता संपत नाही.....!!!!
जीव उरता उरत नाही....!!!!
उठायचा , लढायचा .. स्वतःच्याच आयुष्याशी.....
हसायचं , रडायचं... स्वतःच्याच मनाशी.....
जुळवून घ्यायचं सगळं... गणितं मांडायची आयुष्याची....
नसतंच काही वेगळं.... पण माणुसकी नाही विसरायची.....
क्षण येतात , उपभोगायचे....
जातातही तसेच....आठवायचे.......
असाच आला क्षण आणि जगून घेतले शेवटचे....
आवाज , आक्रोश , रक्त , मरण .....
गोळामोळा झालाय सगळा.........
दहशतीच्या पाठीराख्यांचा....... निर्दयी खेळ सगळा.........
मेला कोण ...? जगला कोण ??? चर्चा करुन उपयोग काय ??
वेदना घेऊन जगेलच कुणीतरी.... अश्रु गाळून हाती काय??
रडायचं , मरायचं , परत परत मरण येतं,...
मरायचं, मरायचं, मातीचंच मरण होतं....
छिन्न होतं , विछिन्न होतं...
"माणूस मेला" एवढंच रहातं...
कसं मांडायचं गणित..? कसे करायचे हिशोब..??
घेऊन गेले क्षण .... बाकी रहाते शून्यं.....
आत आत पाणी पाणी...कोरडे कोरडे डोळे....
सुन्नं सुन्नं वातावरण...ढुमसणारे सुडाचे गोळे...
थांबवा कुणीतरी हे लक्तराचं जिणं.....
जपू देत की आमच्यापुरतं...आयुष्याचं लेणं....
घालायची दहशत घाला की.... करायचे स्फोट...करा की.....
निष्पापांचे खून ...तेही करा.......!
एवढं करुनही... क्षण येणार .... रोजचा...आजचा..... अगदी कालच्यासारखा..... घड्याळ पुढे..... पाऊल पुढे..... आयुष्य पुढे.....
वाट सरता सरत नाही ......
निसटुन जातात क्षण सरसर.....
आयुष्य हातात उरत नाही..... तरीही...... आयुष्यं चालुंच!!!!!!!
सायली मराठे..