वाफाळलेल्या कॉफीचा पहिला घुटका घेत मीराने laptop उघडला ...
रोहनच्या उशिरा येण्याची जणू तिला सवय झाली होती .. facebook उघडून तिने नेहेमीप्रमाणे फोटो पहायला सुरुवात केली .. रोहनच्या दर दिवशी add होणाऱ्या फोटोज वर ती like करू लागली आणि आणि त्यातील काही न समजणारे संदर्भ google करू लागली... हुशार , राजबिंडा आणि अगदी dude वाटे तिला रोहन ...अगदी रोज ... असं वाटे ह्याला रोज बघता आलं तर... ती मनाशीच हसली...काय वेडेपणा ... रोहनला भेटून फक्त ६ महिने झाले होते ..तरी पण मनाचं समाधान होत नव्हतं..
कॉफी संपली आणि ती अजून एक कप भरण्यासाठी उठली...
"hey babe... आहेस का ? किती कॉफी पिशील बाई...come on ... m dead tried"
"बरोब्बर मी इथून उठले की येतोस , छान दिसतोयस ... वाह .."
"Tell me something new , जेवलीस का babe ?"
"हो , अगदी ऋजुता दिवेकर म्हणते तसं , तुला पुस्तक मिळाला का रे... वाच नक्की.."
"Come on ... अगं इथे मला साधं एकदा नीट जेवायला वेळ नाही ... "
"त्याला मराठीत "खाजवायला" वेळ नाही असं म्हणतात बरं का "
"You manage to embarrass me with these phrases बाई , कसं जमतं तुला ?"
"कसं होता आजचा दिवस... आजचा सकाळचा फोटो मस्त काढला आहेस ... पण drive करताना काढलास का रे.. ?"
"नाही ग .. Flyover वरती जॅम झाला होता ... आणि smoke करायला बाहेर पडलो तेव्हा खालती ६ गाड्या एकाच रंगाच्या एकामागे एक उभ्या होत्या... so rare! i had to capture"
"खरय , traffic पण काय शिस्तीत उभा आहे अरे तुझ्या इथे ... कमाल आहे ..."
"तुला कधीपासून सांगतोय .. पण तुझं काहीतरी वेगळंच... अगं इथे पण होईल तुझं network... आणि संध्याकाळी मी आहेच ना..."
"येणार आहे ... तुझ्याशिवाय नाही करमत रे.. "
"नुसतं म्हणतेस..."
"Okay Promise"
"मग करू का Book"
"तू का करशील...अरे नोकरी करते नसले तरी लंडनला येण्यापुरते पैसे आहेत बरं ... "
"बर बाई ...तुझे पैसे देऊन ये ...पण ये ... किती महिने येशील ?"
"महिने ?? नाही बुवा ... २ आठवडे येते .. "
"छान .. मी येतो तेव्हा माझ्या नोकरीला लाख शिव्या घालतेस ...एकच महिना येतो म्हणून टोमणे मारतेस ..बर एक सेकंद ...एक बिअर मारतो ... आज फार काम होतं "
"hmm"
"come on... hmm काय ...BRB"
रोहनची खोली दिसत होती समोर...नीट नेटकी आवरलेली...पुन्हा एकदा तिला कौतुक वाटलं..खूप वेळा मनात यायचं...ह्याला सांगावं...का बरं रोज रोज बीअर लागते ... पण तिने पुन्हा विचार केला...सांगून घेतो...काय कमी आहे ...
"आता माझ्या बीअर बद्दल विचार नको करूस बाई , घरातले झोपले सगळे ? "
"काही विचार करत नव्हते , हो झोपले ना ... आपलं हे बोलणं कुणासमोर करायची इच्छा नसते माझी..."
"तू ना..."
"बाकी काय..."
"बाकी काय , रोज बोलतो आपण ...काय नवीन सांगू.. कुणी छान मुलगी भेटली नाही आज सुद्धा ... आणि तुझ्यापेक्षा सुंदर तर नाहीच ... कामावर फार काही विशेष घडलं नाही...आणि आता जेवायला पिठलं करेन...पण तुझ्यासाखी चव येणार नाही ग..."
मीरा खळाळून हसली... रोहनला अजून काय हवं होतं...
"On that note... आता अंघोळ करतो ग ...उद्या भेटूच....take care ani I love you..."
" Love you too... आणि rol"
"अगं बाई , rofl ...rol नाही , चल , सगळ्यांना hello सांग..bye..."
पाठमोऱ्या रोहनला जाताना पुन्हा एकदा रोजच्यासारखेच वाटले तिला...आता मात्र त्याला भेटायला जायला हवे ... २ वर्षांपासून तोः बोलावत आहे आणि आपण काही ना काही कारण काढून जात नाही ...
आजही त्याला विचारायचं होतं , कधी येशील कायमचा परत.. ? आमच्यापाशी ? आमच्याजवळ ? कधी आणशील नातसून ? हे असं virtual जगात जपलेलं आपलं आजी आणि नातवाचं नातं प्रत्यक्षात कधी येईल ? पण पुन्हा एकदा मीरा हसली ...स्वत:शीच ...
किती वेळा सांगायचा तुला मीरा... हे असं स्वत:च्या अपेक्षा लादत बसलीस तर हाताशी काहीच लागणार नाही...तिने laptop बंद केला...
नातू मोठ्ठा होऊन जेव्हा शिकायला परदेशी गेला तेव्हाच तिने ठरवला होतं... संध्याकाळी देवळाच्या कट्ट्यावर बसून सुनेविषयी गप्पा मारण्यापेक्षा एक तास रोज Computer शिकायचा ... त्यासाठी मिळणाऱ्या pension मधून १२ हजार रुपये भरून तिने class लावला ... MBA होऊन रोहन जेव्हा परत आला तेव्हा आजीसाठी laptop घेऊन ..
ती हरखून गेली... आता रोहनला सांगायला हवं... तुझ्याशी बोलताना तुझं चेहेरा बघता येईल असं काहीतरी असतं ते शिकव मला... ते करूया का... रोहनला सुद्धा फार बरं वाटलं ... त्याला वाटायचं " I have best of both the worlds" ...मीरासारखी त्याला समजणाऱ्या भाषेत बोलणारी , त्याला जमेल असं communicate करणारी आज्जी ... रोहन परत गेल्यावर एकमेकांशी रोज १० मिनिटं का होईना पण बोलणं हे त्या दोघांच्याही सवयीचा भाग झालं होतं .... नातवंड लक्ष देत नाही अशी तक्रार करत बसण्यापेक्षा तिने त्यांच्या वेगाने चालायचं ठरवलं होतं ... कधी कधी खूप थकून जायची... पण स्वत:ला update करणं हा तिचा choice होता... आणि त्यात ती यशस्वी झाली होती..
तिने पुन्हा एकदा laptop उघडला ... रोहनला mail केली... "परवा तू नवीन ipad घेणार म्हणलास ....Buy-Back करणार नसलास तर तुझं जुनं मला देशील का ? शिकायला आवडेल मला ...आता पडी टाकते .. तुझी बाई (आज्जी )"
ipod वर "जितेंद्र अभिषेकी " अशी playlist लावून मीराने पाठ टेकली...
सायली मराठे